बायकिंग ज्ञान

ताईने बाईक चालवायला सुरुवात केली. ती आणि बाईक? मी तिला हसले! पण आयुष्य अजून वेडं करणार होतं. काही वर्षांपूर्वी लडाखमध्ये असताना परिस्थितीनं मला बाईक शिकायला भाग पाडलं. मनात शंका, भीती, असंख्य प्रश्न… पण एकदा बाईक हातात घेतली की एक वेगळीच ऊर्जा जाणवली! त्या रस्त्यांवरून प्रवास करताना मनात एक वेगळीच जाणीव दाटली—हेच तर हवं होतं! आणि ताईला हसता हसता मीही माझी Royal Enfield Classic 350 घेतली. हायवेवरचं ट्रॅफिक बघितलं की अजूनही गडगडल्यासारखं होतं. पण एकदा का बाईक सुरू केली, वेग घेतला, रस्त्यावर मिसळले की सगळं मागे राहतं. वाटतं हा रस्ता कधी संपूच नये!

कार शिकण्याची गरज नाही, ड्रायव्हिंगची आवड नाही, असं ठाम ठरवून मी ताईला हसत होते. पण नियतीच्या खेळाला कोण रोखू शकतं? काही वर्षांनी मला कार शिकावी लागली, आणि हळूहळू मला ड्रायव्हिंग आवडू लागलं. मग ताईने बाईक चालवायला सुरुवात केली. ती आणि बाईक? मी पुन्हा हसले, टिंगल केली. पण ती आपली ठाम. स्वतः एवढुश्शी असून Royal Enfield Thunderbird 350 घेतली! वेडीच होती ती!

पण आयुष्य अजून वेडं करणार होतं. काही वर्षांपूर्वी लडाखमध्ये असताना परिस्थितीनं मला बाईक शिकायला भाग पाडलं. लद्दाख फिरायचं होतं पण टॅक्सी शिवाय पर्याय नव्हता, शिवाय एकटीला टॅक्सी घेऊन फिरणं परवडणारं नव्हतं. सिझन संपत आल्यामुळे नॉन गिअर्ड गाड्या मिळत नव्हत्या. मग एका मित्राला पटवलं मला बाईक शिकवायला. चोगलमसारच्या रस्त्यावरून जातानाच त्यांनीच आधी पाडलं! झालं म्हंटलं याला तरी येते का नाही बाईक काय माहित? पण सुमसान रस्ते बघून गिअर वगैरे कसे टाकायचे हे शिकून घेतलं. दुसऱ्या दिवशी बाईक वाल्याकडे जाऊन बाईक घेतली, त्याचा माझ्यावरचा विश्वास आधीच उडालेला होता त्यामुळे त्याला मागे बसवून एक फेरी मारून आणली म्हंटलं येते रे मला पण बाईक चालवायला. मग सलग चार दिवस बाइक लेहच्या आजूबाजूला एकटीनी फिरवली. मग एके दिवशी लामायुरू पर्यंत जाऊन आले. जाऊन येऊन जवळपास २५० km अंतर! 

मनात शंका, भीती, असंख्य प्रश्न… पण एकदा का बाईक हातात घेतली की एक वेगळीच ऊर्जा जाणवते! त्या रस्त्यांवरून प्रवास करताना मनात एक वेगळीच जाणीव दाटली—हेच तर हवं होतं! आणि ताईला हसता हसता मीही माझी Royal Enfield Classic 350 घेतली.

कधी एकटी, कधी ग्रुपसोबत… काश्मीर, लडाख, अरुणाचल, आसाम आणि महाराष्ट्रात फिरले. त्या रस्त्यांवर प्रत्येक क्षण जगला. कधी जोरात वाऱ्यासोबत उधळत गेलं, कधी हळूच थांबून एखाद्या मातीच्या चहाच्या टपरीवर मस्त चहा घेतला. काही गोष्टी शब्दात नाही सांगता येत, त्या फक्त अनुभवायच्या असतात!

आजही घरातून बाहेर पडताना मनात धाकधूक असते. हायवेवरचं ट्रॅफिक बघितलं की गडगडल्यासारखं होतं. पण एकदा का गाडी सुरू केली, वेग घेतला, रस्त्यावर मिसळले की सगळं मागे राहतं. वाटतं हा रस्ता कधी संपूच नये!

मुख्य रस्ता सोडून एखाद्या आडवाटेने जावं. झाडांच्या सावलीतून रमतगमत निघावं. स्वतःशी गप्पा मारत, मनात विचारांचा प्रवाह वाहू द्यावा. मध्येच एखादी छोटी चहाची टपरी दिसते, आणि नकळत गाडीचा वेग कमी होतो. मस्त गरम चहा घ्यावा, भोवतालच्या लोकांच्या कुतूहलमिश्रित नजरा झेलाव्या. त्यांचे प्रश्न ऐकावे, त्यांची उत्तरं द्यावी.

कधी एखाद्या टेकडीच्या टोकावर थांबावं, दूरवर पसरलेल्या पर्वतशिखरांकडे पाहावं. कधी रस्त्यातल्या एखाद्या पाण्याच्या डबक्यातून डुबुक करत जावं. कधी अचानक मनाला वाटावं—समुद्राकडे जावं! मग कुठल्याही प्लॅनशिवाय दिशाच बदलावी आणि समुद्रकिनाऱ्यावर पोहोचावं. वाळूत लोळावं, लाटांमध्ये मनसोक्त डुंबावं… आणि या छोट्या मोठ्या क्षणांमध्ये खरंखुरं आयुष्य जगावं!

प्रवासासाठी कोणतंही साधन चालेल—बाईक, कार, बस, ट्रेन, विमान, हत्ती, रिक्षा, होडी, किंवा फक्त दोन पाय! काहीही चालेल, फक्त निघायला हवं! मला रायडर किंवा बायकर म्हणवून घ्यायला आवडत नाही, पण प्रवासी हे बिरूद मात्र अभिमानाने मिरवते. कारण हा प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नव्हे, तर स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे.

oppo_32

प्रवासाच्या बाबतीत लोकं मला हक्काने फोन करतात. कोणी नवा ट्रेक प्लॅन करतो, तर कोणी लांबच्या प्रवासाची माहिती विचारतो. मी शक्य तितकी मदत करते, आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांच्यासोबत प्रवासालाही निघते. प्रवासातून मिळणाऱ्या आठवणी या नेहमीच्या जगण्यापेक्षा खूप वेगळ्या असतात.

हेच तर खरं आयुष्य आहे—रस्त्यावरचं, मोकळं, बेधुंद आणि जिवंत!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top