पावसाळा आणि गड-किल्ले हे नातं वेगळंच असतं. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरलं तरी जी भन्नाट जाणीव गड-किल्ल्यांच्या कुशीत पावसाळ्यात येते, ती कुठेच येत नाही. ढगांमध्ये लपलेली शिखरं, दाट धुक्यातून उमटणारे दगडगोट्यांचे अस्पष्ट आकार, डोंगर उतारावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारा, आणि वरून सतत बरसणारा पाऊस… या सगळ्यात हरवून जाण्याची मजा काही औरच!
रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा पावसाची सर नुकतीच ओसरली होती. कुठेही गेलं तरी काही ट्रेक्स ठरवून होतात आणि काही अगदी अचानक. हा त्यातलाच एक! तयारीही नव्हती, पायात साध्या चप्पला होत्या, आणि सोबत लहान मुलंही. पण डोंगराच्या माथ्यावरून डोकावणाऱ्या रायरेश्वराच्या टोकाने सगळं विसरायला लावलं. “थोडं पुढे जाऊन परत येऊ” असं म्हणत म्हणत, मुलांनीच पहिला नंबर लावला आणि आम्ही सगळे गड चढायला लागलो.

पाऊस आणि मातीमुळे पाय घसरत होते. साध्या चप्पलांनी तग धरला नाही, मग ठरवलं—अनवाणीच चालायचं! पायाखाली दगड, काटे, ओलसर गवत, मऊ चिखल… पण कुठे काही जाणवलंच नाही. समोर धुक्यात हरवलेला डोंगर, माथ्यावरून वाहणारा गार वारा आणि मनात दाटून येणारी उत्सुकता—या सगळ्यानेच पावलांना अधिक वेग दिला.
गड सर केल्यावर उंचावरून समोर पसरलेला धुक्याचा पट्टा पाहून भारावून गेले आणि निशब्द होऊन काही क्षण फक्त निसर्ग बघत राहिले. कधी कधी गर्दीपासून दूर राहून स्वतःला देखील अनुभवायचं असतं. स्वतःशी बोलायला वेळ हवा असतो. “मला नक्की काय वाटतं? का वाटतं?” या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं इथं आपोआप सापडतात.

रायरेश्वर म्हणजे इतिहास जिवंत होण्याचं ठिकाण! इथल्या देवळात शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती. गडावर पोहोचल्यावर पहिल्यांदा नजर पडते ती त्या साध्या, दगडी मंदिरावर. आत शिरलं की गाभाऱ्यात शिवलिंग आणि बाजूला एक जुना, रेखीव नंदी! त्या नंदीसमोर हात जोडताना नकळत मन इतिहासाच्या पानांमध्ये हरवलं.
त्या काळात महाराजांना काय वाटलं असेल? ते मोजकेच मावळे, डोंगर-दऱ्यांमध्ये फिरून मुघलांविरुद्ध लढण्याची तगमग, स्वराज्याचं स्वप्न… हे सगळं त्या जागेत उभं राहिलं की जिवंत वाटायला लागलं. काही क्षण तरी भूतकाळाशी संवाद साधल्यासारखं वाटलं आणि “स्वराज्याची शपथ” हा इतिहासाच्या पुस्तकातला धडा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला.

नास्तिक असूनही काही ठिकाणांची ऊर्जा मनाला भिडते. जुन्या देवळांमध्ये, गर्दीपासून दूर असलेल्या शांत स्थळी, नकळत हात जोडले जातात. रायरेश्वराचं मंदिर असंच होतं, इथल्या प्रत्येक दगडाला, प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीला, एक एक भावना वर वर येत होती. मनातल्या बऱ्याच का? कशा साठी? कोणा साठी? वगैरे अनेक प्रश्न मनात पिंगा घालायला लागले. सगळ्यांची उत्तरं मिळालीच असं नाही पण निदान सुरुवात तर झाली!
गड उतरायला लागलो तसं मन जड झालं. अजून थोडा वेळ हवा होता. अजून थोडा पाऊस, अजून थोडं धुकं, अजून थोडा इतिहास… पण सगळ्या प्रवासाला शेवट असतोच.
गडाच्या टोकावरून शेवटचं एक कटाक्ष टाकला. पावसाच्या थेंबांनी चिंब भिजलेलं रायरेश्वराचं मंदिर, समोरच्या दऱ्यात हरवलेलं धुकं, आणि गडाच्या पायथ्याशी वाट पाहणारी घनदाट झाडी… हे सगळं आठवणीत घेऊन परत फिरले.
पण एक जाणवलं—मी गडावरून खाली उतरले, पण रायरेश्वर मात्र अजूनही मनात होता. आणि राहिलचं!
Love,
Shweta